श्रावण स्वरधारा, ऑगस्ट २०२६
यास संगीत विद्यालय, दादर येथे शनिवार दिनांक २२/०८/२०२६ रोजी संध्याकाळी ‘श्रावण स्वरधारा’ हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच कार्यक्रम अतिशय सुश्राव्य आणि देखणा झाला. दरवर्षी श्रावण महिन्यात हा कार्यक्रम संपन्न होतो. ‘पावसाच्या गाण्यांसोबतच श्रावण महिन्यात येणाऱ्या विविध सणांवर आधारित गाणी म्हणायची’ अशी संकल्पना मांडून विद्यार्थ्यांना गाणी निवडण्यासाठी तसे आवाहन करण्यात आले. या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेला विद्यार्थ्यांकडून दरवर्षीप्रमाणे खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पावसासोबतच कृष्णावरची गाणी, नागपंचमी, रक्षाबंधन, इत्यादी सणांवर आधारित तसेच देशभक्तीपर काही परिचित काही अपरिचित अशी विविधरंगी मराठी – हिंदी गाणी विद्यार्थ्यांनी मोठ्या तयारीने आणि आत्मविश्वासाने सादर केली. प्रत्यक्ष कार्यक्रमात गाण्यांसोबत वाद्यांची साथसंगत करण्यासाठी आपल्याच विद्यालयातले विद्यार्थी आलटूनपालटून बसत होते.
‘बागेश्री’ रागावर आधारित आणि कवी बा भ बोरकरांच्या लेखणीतून उतरलेले ‘घन वदन मदन मोहन गे’ हे गीत गाऊन सौ. स्वरालीमॅडम यांनी उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कर्णमधुर कार्यक्रमाची सुश्राव्य सांगता केली.
या सांगितिक मैफिलीतले काही महत्वाचे क्षण, छायाचित्रकार श्री शिगवण यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले. कार्यक्रमासाठीचा फलक लावणे, स्टेजची मांडामांड, साऊंड सिस्टीम लावणे, सूत्रसंचालन आणि कार्यक्रम संपल्यानंतर सगळी आवराआवर करून जागा पूर्ववत करणे या कामांसाठीचा आपल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि सादरीकरण तसेच विद्यार्थांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे महत्त्वाचे काम समस्त शिक्षकवृंदाने मोठ्या आनंदाने केले.
एकंदरीतच श्रावण स्वरधारा हा कार्यक्रम श्रवणीय आणि प्रेयस होता. विद्यार्थ्यांमधल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्याच सहभागातून असे वैविध्यपूर्ण उपक्रम व्यास संगीत विद्यालयात नेहमीच राबवले जातात. त्याला विद्यार्थ्यांचा कायमच अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो, त्यामुळे असे कार्यक्रम सदैव यशस्वी होतात. २२ तारखेला पार पडलेल्या आणि स्वरधारांनी न्हाऊन गेलेल्या या सायंकालीन संगीत जलशात विद्यार्थी तसेच कानसेन श्रोत्यांची शेवटपर्यंत उत्स्फूर्तपणे टिकलेली हजेरी, प्रत्येक गाण्याला मिळणारी वाहवा हीच ‘श्रावण स्वरधारा’ या कार्यक्रमाच्या झळझळीत यशाची पोचपावती होती असे म्हणायला हरकत नाही.
Dear Students,
Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.
For further information, kindly contact :
Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)
Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)