Menu

व्यास संगीत विद्यालय येथे दिनांक १७/०८/२०१९ रोजी सायं. ४.०० वाजता ‘श्रावण स्वर धारा’ हा श्रावण व पाऊस या विषयावर आधारित गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.

सालाबादप्रमाणे व्यास संगीत विद्यालय, दादर येथे शनिवार दिनांक १७/०८/२०१९ रोजी सायं. ४.०० वाजता ‘श्रावण स्वर धारा’ हा श्रावण व पाऊस या विषयावर आधारित गाण्यांचा कार्यक्रम यशस्वीपणे सादर करण्यात आला. दरवर्षी या सांगितीक उपक्रमास समस्त विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळतो. यावर्षीसुद्धा आपली गायनकला सादर करण्यास इच्छुक अशा साधारणतः ८० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावे दिली, यावरूनच हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या खूप आवडीचा असल्याचे अधोरेखित झाले. गायनास इच्छुक अशा जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी आपापले गाणे उत्साहाने सादर केले. सर्वच वयोगटातील या नवोदित कलाकारांचा उत्साह कौतुकास्पद होता. लेखनविस्तारभयामुळे सर्व विद्यार्थी आणि त्यांनी म्हटलेल्या गाण्यांची यादी इथे देणे शक्य नाही, परंतु समस्त विद्यार्थ्यांचा गायनप्रयास निश्चितच वाखाणण्याजोगा होता.

यावर्षी विद्यार्थ्यांना गाणी निवडण्यासाठी श्रावण आणि पाऊस या विषयासोबतच, (बाबूजी म्हणजे स्वर्गीय श्री. सुधीर फडके यांचे हे जन्मशताब्दीवर्ष असल्यामुळे) ‘बाबूजींनी म्हटलेली / संगीतबद्ध केलेली गाणी’ असा विषय देखील देण्यात आला होता, त्यामुळे पाऊस गाण्यांसोबत बाबूजींची अनेक भाव/ भक्तीगीते ऐकायला मिळाली. या वेगळ्या विषयामुळे कार्यक्रम साचेबद्ध न राहता त्यात वैविध्य आले, कानसेनांसाठी ही विषेश पर्वणी होती आणि श्रोत्यांनी त्याचा भरभरून आनंद घेतला.

कार्यक्रमात साथसंगत करायला हार्मोनियमवर स्वतः सौ.स्वरालीमॅडम होत्या तर तबला, ढोलकी आणि साईड रिधमवर आपल्याच क्लासचे कलानिपुण, अनुभवी आणि उत्साही विद्यार्थी सहभागी झाले होते. उत्कृष्ट ध्वनीसंयोजनामुळे कार्यक्रम श्रवणीय होण्यास हातभार लागला, याची जबाबदारी सुद्धा आपल्याच क्लासच्या गुणी विद्यार्थ्यांकडे होती, आणि त्यांनी ती उत्तमपणे निभावली.

सूत्रसंचालनाचे अवघड काम श्री. सचिन गावडे याने लिलया पेलले, त्यामुळे कार्यक्रम कुठेही न रेंगाळता वेळेत सुरु होऊन वेळेतच त्याची सांगता झाली.

कार्यक्रमात उपस्थितांना रुचकर अल्पोपहार देण्यात आला. त्यासाठी विद्यार्थ्यांनीच स्वयंस्फूर्तीने ऐच्छिक वर्गणी जमा केली.

‘सनईचा सूर’ या दमदार गाण्याने गणेशस्मरण करून या यशस्वी कार्यक्रमाची यथार्थ सांगता झाली.

या कार्यक्रमास पं.श्री.विद्याधर व्यास सर, श्री.सुभाष व्यास सर व समस्त शिक्षकवृंदाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य लाभले.

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay