Menu

व्यास संगीत विद्यालय येथे दिनांक २०/०७/२०१९ रोजी खास ‘गुरुपौर्णिमेनिमित्त’ शास्त्रीय संगीत – गायन आणि वादन हा कार्यक्रम संपन्न झाला.

व्यास संगीत विद्यालय येथे दिनांक २०/०७/२०१९ रोजी खास ‘गुरुपौर्णिमेनिमित्त’ शास्त्रीय संगीत – गायन आणि वादन हा कार्यक्रम संपन्न झाला.

कलानिपुण अशा आपल्या अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपापल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम तयारीने खूप श्रवणीय गायन आणि वादन सादर केले.

माननीय श्री. कुलकर्णीसर आणि मान्यवर शिक्षकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.

गायन विभागात समुह गायन प्रकारात अनेक रागातल्या बंदिशी ऐकायला मिळाल्या.

सौ. स्वराली मॅडम यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली क्लासच्या विद्यार्थिनी आयुषा कांबळे,गार्गी कांबळे, चैताली जमीनदार, समिक्षा चव्हाण, आदिती तांबे, वैशाली दावडा, प्रतिमा जोशी, रुपाली जांभरे, विनम्रा पाटील आणि सोनाली बागडे यांनी पं. विष्णू दिगंबर पलुस्कररचित ‘जय जगदीश हरे’ ही प्रार्थना तसेच बिहाग रागातील ‘आज मोरे मंदिर आओ जी’ ही बंदीश फार सुरेलपणे सादर केली. या दोन्ही सादरीकरणात तबल्याची साथ ऋत्विक तांबे याने तर हार्मोनियमची साथसंगत स्वराली मॅडम यांनी केली.

समुह गायनाच्या दुसऱ्या संचात सोनिया राणे, कुंदा कोटियन, सुनिता ठाकूर, संगीता राठोड, ऋतिका, दिक्षा भोसले, आज्ञा कुलकर्णी, सुरेखा गोनल आणि हर्षवी त्रिवेदी यांनी भूप रागातील ‘मुरली अधर धर शाम सुंदर’ ही पारंपारिक बंदिश मोकळ्या आवाजात तन्मयतेने सादर केली. या वेळी तबल्यावर साथीला होते किरण पांचाळ.

गायन विभागात आज उत्तम कामगि-यांची जणू चढाओढच लागली होती. दुर्गा रागातील अतिशय मधुर अशी ‘मनमोहन मुरलीवाला’ ही बंदिश लक्ष्मी भोवड, भक्ती खंदारे, मेधा निजाई, वैष्णवी वर्तक, गणेश शिंदे, निधी कामत, किन्नरी आणि सुवर्णा सुर्वे या विद्यार्थी / विद्यार्थिनींनी सादर केली.

हार्मोनियम विभागात श्री. विलास कुंदेकरसर यांच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सरस कामगिरी केली. समुह हार्मोनियमवादन प्रकारात पुजा नागवेकर आणि शर्मिला आंबवणे यांनी राग ‘बिहाग’ तर एकल वादन विभागात श्री. लक्ष्मण दळवी यांनी राग ‘भिमपलासी’ पेश केला. पुढे याच रागावर आधारित ‘इंद्रायणी काठी’ हे भजन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सादर केले. त्यानंतर सिध्देश पोफळे या गुणी विद्यार्थ्याने हार्मोनियमवर राग ‘मालकंस’ मधली ‘कोयलिया बोले’ ही मधुर बंदिश विविध आलापांसकट फारच प्रभावीपणे सादर केली. त्याच रागावर आधारित ‘कानडा राजा पंढरीचा’ हा अभंग त्यातल्या छोट्या छोट्या हरकतींसकट तांत्रिकदृष्ट्या अतिशय सरस आणि भावपूर्ण पद्धतीने सादर केला. हार्मोनियमवर हळूवार पण अचूकपणे आणि सहजतेने बोटे फिरवण्याचे या विद्यार्थ्यांचे हे तंत्र विशेष लक्षवेधी ठरले.

तबला वादन विभागात आज मोठीच बहार आली. या समस्त विद्यार्थ्यांना तबल्यावर दमदार थाप देताना बघून श्रोते मंत्रमुग्ध झाले. एकल तबलावादनात निहार यादव यांनी ‘त्रिताल’, तर सुनिल भोसले यांनी काहीसा अनवट ‘रुद्रताल’ खूप तयारीने सादर केला. समुह तबलावादनात प्रियांशु आणि हर्ष या चिमुरड्या जोडगोळीने ‘त्रिताल’ पेश करून त्या ठेक्यावर श्रोत्यांना डोलवले.

दुसऱ्या संचात श्रेयस मोरे आणि कौशल मालपेकर या मुलांनी तबल्यावर झपतालाचा ठेका मोठ्या तयारीने धरला आणि उपस्थित श्रोते या छोट्यांचे वादनकौशल्य पाहून अचंबित झाले. शेवटी टाळ्यांचा कडकडाट ही त्याचीच पोचपावती होती.

श्री. अरूण कुंदेकरसर आणि श्री. गोविंद काळसेकरसर यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली शिकणारे तबल्याचे हे गुणी विद्यार्थी समस्त श्रोत्यांची वाहवा मिळवून गेले.

तबला वादन विभागात आज श्रोत्यांसाठी एक विशेष पर्वणी होती. आपल्या व्यास संगीत विद्यालयाचे माजी विद्यार्थी (विशारद पूर्ण) क्षितिज पाटील आणि रविकिरण खरटमल आज कार्यक्रमात उपस्थित होते आणि श्रोत्यांनी त्यांच्या वादन कौशल्याची अपूर्व अनुभूती घेतली. विशेष म्हणजे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून या दोघांनाही त्यांचे गुरु श्री अरुण कुंदेकर सर यांच्या समवेत आपली कला सादर करण्याची संधी मिळाली, हा दुग्धशर्करा योग होता. त्रिताल हा किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे वाजवता येतो याचा अनुभव श्रोत्यांनी घेतला. या तिघांचेही वादन कौशल्य किती उच्च दर्जाचे आहे ते जाणवत होते. या मागे त्यांनी घेतलेली मेहनत आणि अभ्यास या गोष्टींच प्रतिबिंब त्यांच्या सादरीकरणात स्पष्ट पडत होतं. नवीन विद्यार्थ्यांनी या गोष्टी निश्चितच शिकण्यासारख्या आहेत. त्यांना हार्मोनियमची साथ सुनिल भोसले यांने केली. सुनिल हा विद्यार्थी खूपच हरहुन्नरी आहे. त्याने हार्मोनियमवर साथसंगततर केलीच पण हा उत्कृष्ट तबलावादकदेखिल आहे आणि त्याचबरोबर ध्वनिप्रक्षेपणाची व्यवस्था बघण्याचे कामसुद्धा तितक्याच चोखपणे करतो. असे बहुपेडी विद्यार्थी लाभणे ही आपल्या क्लाससाठी विशेष गोष्ट आहे.

सतार वादन विभागात सौ. बोपर्डीकर यांनी ‘मालकंस’ राग आळवला. सतार हे वाजवण्यास तसे अवघड तंतुवाद्य परंतु सतारीच्या तारांमधून निघणारी मिंड ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता.

आजच्या कार्यक्रमातली विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे व्यास संगीत विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय पं. विद्याधर व्यास आणि सौ. सुनिला विद्याधर व्यास हे या कार्यक्रमास स्वतः उपस्थित होते. मार्च – एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या उभयतांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर माननीय विद्याधर व्यास आणि श्री. सुभाष व्यास सरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन केले.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कार्यक्रमाचा कळसाध्याय गाठला गेला तो एका विशेष कार्यक्रमामुळे, जेव्हा समस्त विद्याथ्यांसमोर स्वतः पंडित विद्याधर व्यासांनी शास्त्रीय संगीतातील काही बंदिशी सादर केल्या. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प्रथम त्यांनी गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व सांगितले. राग भूपची माहिती त्यांनी खूप सोप्या पद्धतीने विशद करून सांगितली. नंतर त्यांनी त्याच रागातली ‘जब ही सब नृपत निरास भये’ ही सीता स्वयंमवरातल्या एका प्रसंगाचे वर्णन असणारी बंदिश खूप अप्रतिम पद्धतीने सादर केली. समस्त गायन वादनाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात सुरवातीलाच शिकवण्यात येणारी आणि परिचयाची असलेली भूप रागातलीच ‘मंगलमय जय वाणी गजानन’ ही प्रार्थना त्यांनी त्यातल्या आलाप, ताना आणि बारकाव्यांसकट अतिशय प्रभावीपणे गाऊन दाखवली. त्यानंतर पं. पलुस्कर परंपरेच्या भजन गायकीला अनुसरून गुरुगौरवपर, संत कबीररचित आणि हमीर रागावर आधारित भजन ‘गुरुबिन कौन बतावे बाट’ सादर केले. व्यास सरांच्या प्रभावी आणि दमदार गायकीला तितक्याच तोलामोलाची साथसंगत लाभली. तबल्यावर श्री अरुण कुंदेकर सर आणि हार्मोनियमवर सौ. स्वराली मॅडम यांनी संगत करायची जबाबदारी समर्थपणे पेलली.

त्यानंतर पं. विद्याधर व्यास यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त देशभरात अनेक शहरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, त्या कार्यक्रमांची माहिती सरांच्या पत्नी सौ. सुनिला व्यास (ज्या आपल्या क्लासच्या ट्रस्टी आहेत, त्याचप्रमाणे त्या उत्तम सतारवादक सुद्धा आहेत) यांनी दिली. पं. व्याससरांवर Cinematographer आणि filmmaker श्री. नंदित देसाई हे एक documentary बनवत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून पंडितजींनी आज सादर केलेल्या सगळ्या बंदिशींचं चित्रीकरण करण्यात आलं. ही documentary पूर्ण झाल्यावर व्यास संगीत विद्यालयात दाखवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची पूर्व तयारी करण्यात निकिता,विक्रांत,समीर,दर्शना,क्षितीज,अमोल यांचा सहभाग होता त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमात कलाकारांना तबल्याची साथ संगत करण्याचे महत्वपूर्ण काम आपल्या क्लासचे कसलेले आणि गुणनिपुण विद्यार्थी ऋत्विक श्रीधर, श्रेयस, किरण, विक्रांत आणि निहार यांनी केले तर हार्मोनियम संगतीची जबाबदारी सुनिल भोसले, स्वराली मॅडम आणि अरुण कुंदेकरसर यांनी उचलली.

श्रोत्यांना हा कार्यक्रम व्यवस्थित ऐकता यावा म्हणून ध्वनीप्रक्षेपणाची चोख व्यवस्था बघण्याचे काम सुनिल भोसले आणि प्रसाद गावंड यांनी केले. तर या मैफिलीचे क्षण कॅमे-यात टिपण्याचे काम फोटोग्राफर श्री कमलेश दादरकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजनबद्ध सुत्रसंचालन व निवेदन कु.दर्शना गडमुळे यांनी केले.

सर्व विद्यार्थी तसेच माननीय शिक्षक यांच्या अमूल्य योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.

शब्दांकनःश्री.गिरीश घैसास

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay