Menu

श्रावण स्वरधारा, ऑगस्ट २०२३

व्यास संगीत विद्यालय, दादर येथे शनिवार दिनांक २६/०८/२०२३ रोजी संध्याकाळी ‘श्रावण स्वरधारा’ हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अपेक्षेप्रमाणेच कार्यक्रम अतिशय सुश्राव्य आणि देखणा झाला. दरवर्षी श्रावण महिन्यात हा कार्यक्रम संपन्न होत असला तरी यावर्षीच्या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे ‘पावसाच्या गाण्यांसोबतच श्रावण महिन्यात येणाऱ्या विविध सणांवर आधारित गाणी म्हणायची किंवा वाद्यावर वाजवायची’ अशी आगळीवेगळी संकल्पना मांडून विद्यार्थ्यांना गाणी निवडण्यासाठी तसे आवाहन करण्यात आले. या वैशिष्ट्यपूर्ण कल्पनेला विद्यार्थ्यांकडून खूपच सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पावसासोबतच कृष्णावरची गाणी, दहीहंडी, नागपंचमी, रक्षाबंधन इत्यादी सणांवर आधारित काही परिचित काही अपरिचित अशी विविधरंगी मराठी – हिंदी गाणी विद्यार्थ्यांनी मोठ्या तयारीने आणि आत्मविश्वासाने सादर केली. प्रत्यक्ष कार्यक्रमात गाण्यांसोबत वाद्यांची साथसंगत करण्यासाठी आपल्याच विद्यालयातले विद्यार्थी आलटूनपालटून बसत होते.

गोविंदावर आधारित गाण्यांचे Medley स्वरूपात खूप दमदार आणि उत्तम सादरीकरण झाले. संगीत विशारद कैवल्य रायकर याने ‘श्रावणात घननीळा बरसला’ हे गाणे हार्मोनियमवर अतिशय सुंदर पद्धतीने वाजवून दाखवले. वादनात छोट्या छोट्या जागा सराईतपणे आणि लिलया घेण्याचे त्याचे कसब अचंबित करणारे होते. गाण्यातला शब्द नी शब्द हार्मोनियमवर स्पष्टपणे ऐकू येत होता. हे वादन ऐकून ‘हार्मोनियम बोलते’ म्हणजे नेमके काय? याचा प्रत्यय श्रोत्यांनी घेतला. ‘पटदीप’ रागावर आधारित ‘बाजे रे मुरलिया बाजे’ हे गीत गाऊन सौ. स्वरालीमॅडम यांनी उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या कर्णमधुर कार्यक्रमाची सांगता केली.

या संपूर्ण कार्यक्रमाला एका सूत्रात बांधायचे म्हणजेच निवेदनाचे काम कु. दर्शना गडमुळे यांनी उत्तमपणे पार पाडले. या सांगितिक मैफिलीतले काही महत्वाचे क्षण, छायाचित्रकार श्री कमलेश दादरकर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले. कार्यक्रमासाठीचा नवा फलक तयार करणे, स्टेजची मांडामांड, साऊंड सिस्टीम लावणे आणि कार्यक्रम संपल्यानंतर सगळी आवराआवर करून जागा पूर्ववत करणे या कामांसाठीचा आपल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. कार्यक्रमाचे नेटके नियोजन आणि सादरीकरण तसेच विद्यार्थांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे महत्त्वाचे काम समस्त शिक्षकवृंदाने मोठ्या आनंदाने केले.

एकंदरीतच श्रावण स्वरधारा हा कार्यक्रम श्रवणीय आणि प्रेयस होता. विद्यार्थ्यांमधल्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्याच सहभागातून असे वैविध्यपूर्ण उपक्रम व्यास संगीत विद्यालयात नेहमीच राबवले जातात. त्याला विद्यार्थ्यांचा कायमच अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो, त्यामुळे असे कार्यक्रम सदैव यशस्वी होतात. २६ तारखेला पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी तसेच कानसेन श्रोत्यांची शेवटपर्यंत उत्स्फूर्तपणे टिकलेली हजेरी, प्रत्येक गाण्यानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि मिळणारी वाहवा हीच ‘श्रावण स्वरधारा’ या कार्यक्रमाच्या झळझळीत यशाची पोचपावती होती असे म्हणायला हरकत नाही.

(श्री.गिरीश घैसास यांच्या लेखणीतून)

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay