Menu

संगीत दीपोत्सव २०२६

दीपो नाशयते ध्वान्तं
धनारोग्ये प्रयच्छति।
कल्याणाय भवति एव
दीपज्योतिर्नमोऽस्तुते॥

दिव्याच्या ज्योतीने तिमिरातून तेजाकडे नेणारी सौख्यप्रदायिनी दिवाळी जवळ आल्याची जाणीव करून देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. कंदील, रांगोळी, पणत्या, फटाके, फराळ, भेटवस्तू, दिवाळीअंक वगैरे. पण व्यास संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरता वर उल्लेख केलेल्या गोष्टींव्यतिरिक्त, दिवाळी समीप आल्याची जाणीव करून देणारी आणखी एक महत्वाची आणि प्रेयस गोष्ट हरसाल घडत असते, ती म्हणजे संगीत दीपोत्सव हा कार्यक्रम. दिवाळीचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी हा सांगितिक उपहार विद्यार्थ्यांतर्फे सादर केला जातो. विद्यार्थ्यांच्या दिवाळीची सुरवात या संगीत सोहळ्यानेच होते असे म्हणणे संयुक्तीक ठरेल. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही, मंगलमय दिवाळीचं संगीतमय स्वागत करण्यासाठी ‘संगीत दीपोत्सव’ हा कार्यक्रम शनिवार दिनांक २४/१०/२०२६ या दिवशी संध्याकाळी व्यास संगीत विद्यालयाच्या दादर येथील वास्तूत विद्यार्थी, शिक्षक आणि श्रोते यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात पार पडला.

श्री. कुलकर्णी सरांच्या हस्ते प्रतिकात्मक दीपप्रज्वलन झाल्यावर कार्यक्रमाची औपचारिक सुरवात झाली. तबला पेटीच्या सहाय्याने श्रोत्यांसमोर गायची अमूल्य संधी मिळत असल्याने, अशा कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा नेहमीच उदंड प्रतिसाद मिळतो. तसा तो या कार्यक्रमास देखील मिळाला. हिंदी – मराठीतील विविध भावगीते, भक्तीगीते, चित्रपटगीते असा भरगच्च सांगितिक नजराणा विद्यार्थ्यांनी हर्ष उल्हासाने सादर केला. साईड रिधम तसेच तबला आणि हार्मोनियमची साथसंगत आपल्याच क्लासचे विद्यार्थी आणि शिक्षक आलटूनपालटून करत होते. त्याला विद्यार्थ्यांनीच हाताळलेल्या साऊंड सिस्टीमची खणखणीत जोड मिळाल्याने कार्यक्रम अधिक उठावदार आणि श्रवणीय झाला.

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीची सामानाची मांडामांड, स्टेज तयार करणे, कार्यक्रमासाठी मुद्दामहून तयार करून घेतलेला फलक लावणे, रोषणाई, साऊंड सिस्टीम, कार्यक्रमाचे शिस्तबद्ध सूत्रसंचालन आणि कार्यक्रम संपल्यानंतरची आवराआवर ही सगळी कामे प्रत्येकवेळी आपल्या क्लासचेच विद्यार्थी मोठ्या आवडीने, उत्साहाने आणि जबाबदारीने करतात, म्हणूनच हे संगीताचे कार्यक्रम विद्यार्थी नियोजित आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित असतात असे म्हणायला हरकत नाही. या उपक्रमास समस्त शिक्षकांचे अतिशय मोलाचे आणि प्रोत्साहनपर मार्गदर्शन लाभते, त्यामुळे हे कार्यक्रम नेहमीच देखणे होतात. दिनांक २४ आॅक्टोबर रोजी पार पडलेला ‘संगीत दीपोत्सव’ हा कार्यक्रम सुद्धा त्याला अपवाद नव्हता. या सांगितिक जलशातले काही महत्त्वाचे क्षण छायाचित्रकार श्री कौस्तुभ कुलकर्णी यांनी त्यांच्या कॅमेरामधे टिपले. आपल्या क्लासच्या विद्यार्थिनी दिव्या सावंत आणि मधुरा पारसेकर यांनी दारात काढलेली रांगोळी अतिशय सुरेख होती. कार्यक्रमात शेवटपर्यंत टिकलेली श्रोत्यांची उपस्थिती आणि प्रत्येक सादरीकरणाला मिळणारी त्यांची वाहवा ही या संगीत जलश्याच्या यशस्वीतेची पोचपावतीच होती.

गायन विभागाच्या शिक्षिका सौ. स्वराली मॅडम यांनी आपल्या सुरेल आवाजात ‘लक्ष दीप हे उजळले घरी’ हे गीत गाऊन या नेटक्या आणि आखिव रेखिव कार्यक्रमाची सांगता केली. शेवटी श्री. कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांना संगीतविषयक बहुमूल्य मार्गदर्शन केले. विद्यालयाचे व्यवस्थापन गेली अनेक वर्षे उत्तमरित्या सांभाळणारे अनुभवी आणि ज्येष्ठ शिक्षक श्री कुलकर्णी सर यांचे अतिशय शांतचित्त आणि संयमी आवाजातील, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे निवेदन विशेष लक्षवेधी होते.

एकंदरीत ‘संगीत दीपोत्सव’ हा कार्यक्रम नेहमीप्रमाणेच खूप श्रवणीय आणि अविस्मरणीय झाला.

शब्द शृंगार
श्री.गिरीश घैसास

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay