Menu

03.02.2019 रोजी विठ्ठल रुखुमाई मंदिर, दादर येथे आयोजित कार्यक्रम

दिनांक ०३/०२/२०१९ रोजी व्यास संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दादर येथील अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात भक्तीगीतांचा अतिशय बहारदार कार्यक्रम सादर केला.विद्यालयातील विद्यार्थीनी श्रीमती शर्मिला आंबवणे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सादर करायची संधी आपल्या विद्यार्थ्यांना मिळाली. श्री.सुभाष व्यास सर तसेच श्री.कुलकर्णी सर यांनी या कार्यक्रमास मान्यता दिली.

श्री. विलास कुंदेकर सर यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची विशेष तयारी करण्यात आली. अगदी सुरवातीपासूनच म्हणजे सुयोग्य विद्यार्थ्यांची निवड करून, त्यांच्या auditions घेऊन, गाणी निवडून ती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांकडून बसवून घेण्यात कुंदेकर सरांनी विशेष मेहनत घेतली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या मिळालेल्या संधीचे अजोड मेहनतीने सोने केले.

ठरल्या वेळेनुसार संध्याकाळी ५.३० वाजता कार्यक्रमाची सुरवात गणेश वंदनेने झाली. श्री. गिरीश वाघेला यांनी ‘ओंकार स्वरूपा’ हे गाणे तन्मयतेने सादर केले. त्यानंतर सौ. मिनल सावंत, श्री. राहुल हांडे, श्री. गिरीश घैसास, श्री. सचिन गावडे, श्री. लक्ष्मण दळवी, श्री. सिद्धेश पोफळे, श्रीमती पुष्पा काळे, श्रीमती दर्शना गडमुळे, सौ. भक्ती खंदारे यांनी एकामागून एक सरस गाणी सादर केली.

शंभो शंकरा, निजरुप दाखवा हो, अबीर गुलाल, खेळ मांडियेला, कानडाऊ विठ्ठलू, कानडा राजा पंढरीचा, माझी रेणूका माऊली अशी भक्तीरसपूर्ण आणि मधुर गाणी तयारीने सादर करत विद्यार्थ्यांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगवत नेला. या सगळ्यावर कळस चढला तो शेवटच्या गाण्याने, जेव्हा समस्त विद्यार्थ्यांनी दमदार आणि जोशपूर्ण आवाजात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अतिशय रोमांचक असे ‘जयोsस्तुते’ हे गीत सादर केले. उपस्थित प्रेक्षकवर्गाने सुद्धा सुरात सूर मिसळून हे गाणे म्हणायला सुरुवात केली.

श्री. विलास कुंदेकर यांच्या अचूक नियोजनामुळे कार्यक्रम कुठेही न रेंगाळता ठरलेल्या वेळेत संपन्न झाला. संपूर्ण कार्यक्रमात हार्मोनियमची साथ करायला स्वतः विलास कुंदेकर सर उपस्थित होते, तर तबल्याची साथ अतिशय गुणी असे श्री. ऋत्विक तांबे व श्री. निहार यादव या विद्यार्थ्यांनी बिनचूकपणे केली. साईड रिधमची जबाबदारी समस्त विद्यार्थ्यांनी आलटूनपालटून पार पाडली.अप्रत्यक्षपणे सौ. स्वराली सावंत मॅडम यांनी आपल्या उत्तम आणि हुशार विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात गायनाची संधी देऊन या कार्यक्रमासाठी आपले योगदान दिले.

कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत असलेली प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थिती आणि किर्तन संस्थेचे संचालक श्री.उपाध्ये काका यांनी ‘पुन्हा असा भक्तीगीतांचा कार्यक्रम करायला हरकत नाही’ अशी पोचपावती दिल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. कार्यक्रमाची सांगता आरतीने होऊन नंतर उत्तम चवीच्या उकडीच्या मोदकांचा प्रसाद वाटण्यात आला.

Dear Students,

          Please be informed that on-premise classes at The Vyas Academy Of Indian Music are held every evening from Monday to Saturday. Classes for Vocal, Sitar, Tabla, Harmonium, Violin, Guitar and Keyboard are conducted.

For further information, kindly contact :

Shri Prabhakar Kulkarni on 9930741488.(10:00 am to 9:00 pm)

Vyas Sangeet Vidyalaya on 9136092358.(10.00 am to 8.00 pm)

Okay